शेतकऱ्यांची दिवाळी आणी एक लुप्त होत असलेली परंपरा |शेणाच्या गवळणी | ग्रामीण परंपरा | दिवाळी विशेष
दिवाळी आणी शेणाच्या गवळणी - एक परंपरा..!
आज काल दिवाळी म्हणजे मोती साबणाची आंघोळ, कैक प्रकारचा फराळ आणी आतिशबाजीने परिसर दणाणून सोडणे इतकचं तिच स्वरूप राहीलं आहे.. पण मूळ दिवाळी जी कृषी प्रधान परंपरेतून आली आहे तीचे एक वेगळचं स्वरूप होतं.. त्याला धर्माच्या गंधा पेक्षा लोकपरंपरेचा आणी नैसर्गिक इतिहासाचा मोठा वसा होता.. कारण दिवाळी हा कृषीजीवनावर आधारीत सण आहे. दिवाळीच्या पाच दिवसांमध्ये कृषी संस्कृतीवर आधारीत विविध प्रथा आणि परंपरा साजऱ्या होतात.. त्यातून समृध्द लोकजीवनाचे दर्शन घडतं.. आज मी तूम्हाला अशाच एका लूप्त होत चाललेल्या गोवळ्या / गवळणी या परंपरे विषयी सांगणार आहे..
महाराष्ट्रात दिवाळीच्या वेगवेगळ्या प्रथा-परंपरा आहेत. त्यापैकीच एक म्हणजे दिवाळीच्या पाच दिवसांमध्ये अंगणा मध्ये शेणा पासून तयार केल्या जाणाऱ्या गवळणी.. दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजे वासुबारसेला गाई म्हशी ची ओवाळणी केली जात असे आणी दिवाळीची सूरूवात होत असे.. त्या नंतर धनत्रयोदशी च्या दिवशी पहिली गवळण तयार केली जायची.. ज्यात गाई च्या शेणा पासून ग्रामीण जन जीवन आणी ऐतिहासिक घटना क्रम साकारला जात असे.. अर्थातच घरातील स्त्रिया या गवळणी बनवतात
घरातील स्त्रिया मोठ्या कल्पकतेने या गवळणी बनवत असत. छोटे शेणगोळे बनवून आधी त्यांना बाहुल्यांचा आकार दिला जाई. सजावटीसाठी पाना-फुलांचा वापर करण्यात येई. यात भाकर थापटणाऱ्या.. विहरीतून पाणी काढणाऱ्या.. माहेरी सणाला आलेल्या बायका असं संपूर्ण ग्रामीण जनजीवन त्या शेणाच्या माध्यमातून साकारलं जायचं..
पाचव्या दिवशी म्हणजेच बलिप्रतिपदा रोजी लोक जीवनातील वेगवगेळय़ा घडामोडी या गवळणींच्या माध्यमातून दाखविण्यात येत असतानच... पाचव्या दिवशी शेतकऱ्यांचा वाली बळीराजा साकारला जातो.. यात बळीराजा.. त्याचा महल.. त्याच सैन्य आणी ऐश्वर्य दाखवल जातं.. आणी “इडा पड़ा टळो आणी बळीराजाच राज्य यावो” असं म्हणत मूळनिवाशी बळीराजची आठवण काढली जाते.. लोककथे प्रमाणे जरी वामना ने बळीराज्याला कपटाने पाताळात गाडलं असलं.. तरी आज ही शेतकऱ्याने आपल्या बळी राज्याला अशा प्रथा मधून जीवत ठेवलं आहे..
अशाच गावाकडच्या स्त्रीजीवनातल्या साऱ्या दैनंदिन घडामोडींचं सुंदर, सुबक भावदर्शन या गवळणींमधून व्हायचं. पाच दिवस रोज वेगवेगळ्या प्रकारे गवळणी तयार करण्यात येतात. प्रत्येकजण आपापल्या कलाकौशल्याचं दर्शन शेणाच्या या गवळणी करताना घडवत असे. आपल्या गवळणी इतरांपेक्षा अधिक सुंदर आणि देखण्या कशा होतील याची जणू स्पर्धांच व्हायची.
सलग पाच दिवसांत शेणापासून निर्मिलेल्या गवळणी पुढे घराच्या पतऱ्यांवर, छतावर वाळवत घालण्यात येतात. आणी त्या जपून ठेवून दर्शवेळ अमावस्येला (मार्गशीर्ष) म्हणजेच मराठवाड़ा आणी कर्नाटक पट्यात ‘येळवस’ म्हणून शेतात साजारा केल्या जाणाऱ्या सणात त्यांचे दहन केले जाते. आणी त्यावर दूध उतू घालून निसर्गाला शेतीच्या भरभराटी ची प्राथर्ना केली जाते..!
अशा प्रकारे दिवाळी आणी शेतीचं नाते जाडणारी ही परंपरा आपलं ग्रामजीवन किती समृध्द आणि स्वावलंबी होतं, याचं प्रत्यक्षदर्शी दर्शन ‘गवळणी’ बनविण्याच्या या प्रथेमधून व्हायचं..
पूर्वी दिवाळी मध्ये अंगणात शेणापासून केल्या जाणाऱ्या ‘गवळणीं’ ची ही प्रथा आता इतर अनेक प्रथां प्रमाणे हळूहळू लोप पावत आहे.. महाराष्ट्राच्या ग्रामजीवनाचं आणि गतकालीन ग्रामीण स्त्रियांचं भावविश्व उलगडणाऱ्या या गवळणी आता इतिहास जमा होत आहेत..
आता प्रत्येक घरा पुढे गवळणी केलेल्या दिसत नाहीत. ग्रामीण भागात सूद्धा आता जनावरे राहिले नसल्याने काहीच शेतकरी या परंपरा पाळून आहेत.. आता नव्या पिढीला त्यासाठीचं मार्गदर्शन करणाऱ्या आई, सासू, आजी आता राहील्या नाहीत. तरीही काही अपवादात्मक ठिकाणी आपल्या आजी-आई, सासूकडून चालत आलेला वारसा जपण्याचा प्रयत्न काहीजणी करताना दिसतात...
आज सकाळी मी झापेतून उठलो तेव्हा पाहीलं की माझ्या आई ने भल्या पाहटे उठून घरा समोर सडा - रांगोळी करून काही तरी शेणा पासून बनवत आहे ते पाहून मी कुतूहलापोटी आई जवळ जाऊन या बद्दल प्रश्न विचारले की हे काय आहे..? का केलं जात..? काय कारण आहे..? परंतू आता ही परंपरा इतकी विलूप्त होत आली आहे की तीला ही इतकी माहिती नव्हती.. परंतु मी या बद्दल अनेक ग्रामीण जीवना वरील, धार्मिक पुस्तके वाचली होती तसेच काही ग्रामीण जीवन-पद्धतीचे संशोधन, अभ्यासक यांचे लेख वाचले होते त्यामूळे ही माहिती मी आज मांडली आहे..
आज पर्यंत काळाच्या ओघात अशा कित्येक प्रथा नष्ट झाल्या आहेत.. तशी ही प्रथा सूद्धा होतील ही परंतु पुढच्या पिढीच्या माहिती व्हावी यांचं ‘डॉक्युमेंटेशन’ व्हायला हवं.. अन्यथा कधी काळी गावाकडच्या माता - भगिनी, पोरंठोरं दर दिवाळीत शेणापासून काही तरी सुंदर गवळणी बनवत असत नि त्याचाही आनंद घेत असत हे नव्या पिढीला खरं वाटणार नाही. त्यामूळे पुढच्या पिडी साठी हा माहितीचा ठेवा..!
.....✍🏻#दsuryawanshi
फेसबुक वर रिल्स स्वरूपात गवळणी चा विडियो पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा..!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा